VIDEO | मोठ्या धक्क्यानंतर सुप्रिया सुळेंची भावूक प्रतिक्रीया

VIDEO | मोठ्या धक्क्यानंतर सुप्रिया सुळेंची भावूक प्रतिक्रीया

मुंबई: राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपसोबत जाण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेच, पण पवार कुटुंबही कमालीचं दुखावलं आहे. शरद पवारांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस बदलून नाराजी स्पष्ट कबुली दिली आहे. 'पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटले आहेत. विश्वास नेमका ठेवायचा कुणावर?,' असं भावनिक स्टेट्स सुप्रिया यांनी ठेवलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी एका मागोमाग एक व्हॉट्सअॅप स्टेटस टाकून तीव्र नाराजी व्यक्त केली. 'पार्टी अँड फॅमिली स्प्लिट' असं नवं स्टेटस त्यांनी ठेवलं आहे. आमच्या पक्षातच नव्हे तर कुटुंबातही फूट पडली आहे, असं त्यांनी म्हटलंय. पुढच्या स्टेटसमध्ये सुप्रिया म्हणतात, 'विश्वास नेमका ठेवायचा कुणावर? उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा विश्वासघात झालाय. त्यांच्यावर प्रेम केलं. वेळोवेळी त्यांचा बचाव केला. त्याच्या बदल्यात काय मिळालं बघा.'

राज्यात कोणत्याही क्षणी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचं सरकार स्थापन होईल असं वाटत असतानाच अचानक चक्रे फिरली आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी आठ वाजता राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजित पवार भाजपला मिळाल्याचं यातून स्पष्ट झालं. या सगळ्या घडामोडींमुळं एकीकडं राज्यात खळबळ उडाली असताना पवार कुटुंबीयांमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे. शरद पवार यांना अंधारात ठेवून अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय पवार कुटुंबीयांना पटलेला नाही. 

लोकसभा निवडणुकीपासूनच पवार कुटुंबात काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा होती. अजित पवार यांनी हट्टानं त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून पक्षाची उमेदवारी मिळवून दिली होती. त्यांच्या आग्रहामुळं खुद्द पवारांना लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. पार्थ पवार यांचा त्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यामुळं देखील अजित पवार अस्वस्थ होते. ऐन निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामाही दिला होता. अर्थात, शरद पवारांनी अत्यंत खुबीनं ही सगळी प्रकरणं हाताळत त्यावर पडदा टाकला होता. मात्र, पक्षात फूट पाडून भाजपसोबत जाण्याचा अजितदादांचा नवा निर्णय शरद पवारांनाही धक्का देणारा ठरला आहे.

पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी तूर्त काहीही बोलण्यास नकार दिला. 'शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे. त्यानंतर मी मीडियाशी नक्की बोलेन,' असं त्यांनी सांगितलं.
"विश्वास नेमका ठेवायचा कुणावर? उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा विश्वासघात झालाय. त्यांच्यावर प्रेम केलं. वेळोवेळी त्यांचा बचाव केला. त्याच्या बदल्यात काय मिळालं बघा."
-सुप्रिया सुळे


Web Title:  sharad pawars daughter supriya sule changed her whatsapp status says party and family split
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com